Land Records Office | भूमी अभिलेख कार्यालय दलालांच्या 'तावडीत', कारभार ढेपाळला

0

कामकाजाचा खेळखंडोबा 



वैजापूर शहरातील उपाधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाचा कारभार ढेपाळला असून कार्यालयप्रमुखांसह संबंधित कर्मचारी दांड्या मारीत असल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबून आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दांड्या अन् त्यातच अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामकाजाचा खेळखंडोबा झाला आहे. परिणामी नागरिकांची अनेक प्रकरणे प्रलंबित असून नागरिकांना कामासाठी खेट्या माराव्या लागत आहेत. या कार्यालयाचा कारभार गेल्या कित्येक दिवसांपासून 'रामभरोसे' सुरू आहे. याशिवाय दलालांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर वाढला असून कार्यालय अधिकारी चालवितात की दलाल? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

 


वैजापूर येथील उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय


 शहरातील उपाधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाचा कारभार नेहमीच वादग्रस्त राहीलेला आहे. जमीन मोजणीशी महत्वाचे असलेले हे कार्यालय आहे. शेतकरी व सर्वसामान्य जनतेची कामे या कार्यालयावर अवलंबून असतात. जमिन मोजणी, प्रॉपर्टी ( मालमत्ता  ) कार्ड, बॅंक बोजा, बॅंक प्रकरण, वारस नोंद, खरेदी नोंद यासह विविध कागदपत्रे दररोज नागरिकांना लागत असतात. त्यामुळे या कार्यालयात विविध प्रकारचे दाखले व नकलांसाठीही नागरीकांची नेहमीच ये-जा असते.  तालुक्‍यात नांदूर मधमेश्वर सारखे प्रकल्प आहेत. या  प्रकल्पाचे  भूसंपादनाचे अनेक प्रकरणे आहेत.


 भूसंपादनासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळ द्यावा लागत असल्याने याचा परिणाम दैनंदिन कामावर होत आहे. या कार्यालयाकडील जमीन मोजणीसह अन्य  बहुतांश प्रकरणे धूळखात पडून आहेत. नागरीक कामासाठी हेलपाटे मारीत असताना संबंधित अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून त्यांची बोळवण केली जाते. अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे त्यांना काय उत्तर द्यावयाचे? हा प्रश्‍न अधिकाऱ्यांना पडला आहे. मोजणीसाठी जास्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. भूमिअभिलेख कार्यालयात एकूण १६ पदे मंजूर असून त्यातील ६ पदे रिक्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून गावठाण जमीन मोजणीसाठी ड्रोन सर्व्हेचे काम चालू आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी पुढील दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. शिवरस्त्याच्या मोजणीची सुद्धा कामे सुरू आहेत.


 अपुऱ्या मनुष्यबळामुळे कार्यालयाला सेवावृत्त कर्मचाऱ्यांचा आधार  घेऊन कामकाज करण्याची नामुष्की ओढवली आहे. दोन वर्षांपासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर कामाचा गाडा ओढला जात आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा अतिरिक्त भार कर्मचाऱ्यांवर पडत आहे. कामाचा निपटारा होईनासा झाला आहे. त्यामुळे नागरीकांमधून नाराजी व्यक्त होत असून या कार्यालयातील पदे तातडीने भरून कामे मार्गी लावावीत. अशी मागणी जोर धरू लागली आहे. कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, पाटबंधारे व अन्य अनुषांगिक कामांमुळे या कार्यालयातील नागरिकांची कामे खोळंबली आहेत. दरम्यान यासंदर्भात भूमिअभिलेख कार्यालयाचे उपाधीक्षक सुनील मोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.


दलालांशी साटेलोटे 


एकीकडे कार्यालयातील कामकाजाचा खेळखंडोबा झालेला असतानाच दुसरीकडे या कार्यालयात दलालांची लुडबुड वाढली आहे. अपुऱ्या मनुष्यबळाच्या नावाने संबंधित अधिकारी व कर्मचारी बोंब मारतात. परंतु एखादे काम दलालामार्फत गेल्यास त्या कामाला प्राधान्य देऊन ते तात्काळ निकाली काढले जाते. संबंधित कार्यालयातील अधिकारी व दलालांचे साटेलोटे असून 'एम' व्हिटॅमिन दिल्यानंतर कामासाठी चकरा मारण्याची गरज नाही.



'आओ जाओ घर तुम्हारा'


कार्यालयात मनुष्यबळाचा तुटवडा आहेच. परंतु सध्या जे अधिकारी व कर्मचारी आहेत. तेच कार्यालयात नियमित हजर न राहता दांड्या मारतात. दस्तुरखुद्द कार्यालयप्रमुखच अमावास्या - पौर्णिमेला उगवतात. त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांकडून काय अपेक्षा करणार?  मनुष्यबळ अपुरे आहे. हा मुद्दा रास्त असला तरी जे सध्या कार्यरत अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यांची इमानदारीने काम करण्याची मानसिकता किती आहे. हाच संशोधनाचा विषय आहे. या कार्यालयातील ८० टक्के कर्मचारी मुख्यालयी न राहता बाहेरगावाहून ये - जा करतात. दस्तुरखुद्द कार्यालयप्रमुखही याचाच एक भाग आहे. त्यामुळे 'आओ जाओ घर तुम्हारा' अशी अवस्था या कार्यालयाची आहे.



खाबूगिरीने गाठला कळस 


कार्यालयात दलालांचा हस्तक्षेप वाढलाच. परंतु पैसे दिल्याशिवाय कामेच होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. दलालांमार्फत तर मलिदा लाटलाच जातो. परंतु कुणी लहानसहान कामासाठी गेले तरीही कर्मचारी त्याला 'ओरबाडून' घेतल्याशिवाय राहत नाही. नागरिकांनी असंख्य तक्रारी करूनही निर्ढावलेल्या कर्मचाऱ्यांना फरक पडत नाही. एकंदरीत या कार्यालयाने खाबूगिरीचा कळस गाठला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
To Top