डीआरएम सरकार यांचे आश्वासन
वैजापूर शहरानजीकच्या ( Vaijapur City) रोटेगाव रेल्वे स्थानकावर ( Rotegaon Railway Station) लवकरच पुणे एक्सप्रेस व नरसापूर ट्रेनला थांबा देण्यात येणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या डीआरएम मीना सरकार (South Central Railway DRM) यांनी सांगितले. २३ रोजी त्यांनी रोटेगाव रेल्वे स्थानकास भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी एका शिष्टमंडळास सांगितले.
दक्षिण मध्य रेल्वेच्या डीअरएम मीना सरकार या रोटेगाव रेल्वे स्थानकावर तपासणीसाठी आल्या असता भाजप रेल्वे प्रकोष्टच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना भारत मातेची प्रतिमा, शाल व पुष्पगुच्छ देउन सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत वाणिज्य विभागाचे राजिव राॅय व अन्य अधिकारी होते. याप्रसंगी भाजप रेल्वे प्रकोष्टच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे एक्सप्रेस व नगरसूल - नरसापूर ट्रेनला थांबा देण्याची मागणी केली. काजीपेठ वरंगल ११ कि.मी , नांदेड मुखेड २३ कि.मी , बासर निजामाबाद ३१ कि. मी . अंतरावर नगरसूल व नरसापूर ट्रेनला थांबा आहे. मग छत्रपती संभाजीनगर ते रोटेगाव ६० कि.मी .अंतर असतांना रोटेगावला थांबा का नाही ? असा प्रश्न उपस्थित करताच आपल्या मागणीवर प्राधान्यक्रमाने विचार करून लवकरच दोन्ही गाड्यांना थांबा देण्याचे आश्वासन मीना यांनी दिले.
तसेच शिर्डी व नगरसूलहून सुटणाऱ्या सर्व गाड्यांना रोटेगाव स्टेशनवर थांबा दिल्यास रेल्वेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पडेल व प्रवाशांची दक्षिण भारतात जाण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर सोय होईल. रोटेगाव स्टेशनच्या बाहेरील खड्डेयुक्त डांबरी रस्ता प्रकोष्टच्या पदाधिकाऱ्यांनी दाखविल्यानंतर रस्त्याचे काम करण्याची सूचनाही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. दोन्ही बाजूंनी रहदारीस अडथळा करणारी जंगली झाडे तोडून रस्ता मोकळा करून हायमास्ट दिवे लावण्यात यावे. अशीही मागणी यावेळी करण्यात आली व त्यास मीना सरकार यांनी सहमती दर्शवली. यावेळी भाजप रेल्वे प्रकोष्टचे दामोदर पारिक, नीलेश पारख, विठ्ठल सावळे, प्रवीण कोतकर, गणेश पहाडे, विनोद भाटिया आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments